बुधवार, १३ एप्रिल, २०११

बाप्पा

आज तुझ्या देवळात मी 
बघतोय नजर रोखून 
पायऱ्या चढणारा शूर मी   
शरणलो तलवार फेकून 
पुन्हा एकदा देना बाप्पा 
फक्त धार भारी करून 
शप्पथ तुझी आता मी 
लढाई येईन जिंकून 

आज तुझ्या दारात पुन्हा 
बघतोय रे नजर रोखून 
पायऱ्या चढणारा संसारी मी 
आलोय एकटाच नाती सोडून 
पुन्हा एकदा देना बाप्पा 
घट्ट गाठी बांधून 
शप्पथ तुझी आता मी 
गाठी ठेवीन नक्की जपून !

आज तुझ्या दारात पुन्हा 
बघतोय नजर रोखून 
पायऱ्या चढणारा हिशोबी मी 
आलोय खाती सोडून 
पुन्हा एकदा देना बाप्पा 
चुकलेला हिशोब झटपट सोडवून 
शप्पथ तुझी आता मी 
आकडे ठेवीन दरोज मोडून !

आज पुन्हा दारात तुझ्या
बघतोय नजर रोखून 
पायऱ्या चढणारा जुगारी मी 
आलोय डाव अर्धा सोडून 
पुन्हा एकदा देना बाप्पा 
सगळी रमी  जमवून 
शप्पथ तुझी आता मी 
अड्यावर येणार नाही पुन्हा वळून !

पुन्हा पुन्हा दारात तुझ्या 
बघतोय रे नजर रोखून 
पायऱ्या चढणारा दुखी मी 
आलोय अश्रू पुसून 
पुन्हा एकदा देना बाप्पा 
ते सारं स्वप्नाप्रमाणे रंगवून 
शप्पथ तुझी आता मी 
पाहणार नाही डोळे उघडून! 

बास झाला दारात तुझ्या 
शेवटची नजर आहे रोखून 
कारण , पायऱ्या चढतानाच याचकाचा मी 
आलोय गळा दाबून 
नको आता काही बाप्पा 
तू आहेस ना माझात सामावून ?
शप्पथ तुझी आहे मात्र 
शोधून काढीन तुला माझ्या अंतरातून !!!